74,668 बुलडाणेकरांनी आजवर केली कोरोनावर मात!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंध शिथिल झाल्याच्या मुहूर्तावर आज, 20 मे रोजी जिल्ह्यात 591 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. बळींची संख्याही मर्यादेत म्हणजे 4 इतकी आल्याने व बुलडाणा वगळता 12 तालुक्यांत दुहेरी संख्येत रुग्ण आल्याने यंत्रणेवरील ताण आजपुरता का होईना कमी झाला. आज 759 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 436175 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 74668 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3398 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 80535 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 5331 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 536 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
आज केवळ बुलडाणा तालुक्याने तिहेरी (100 रुग्ण) आकडा गाठला. खामगाव 41, शेगाव 97, चिखली 48, मेहकर 49, मलकापूर 54, नांदुरा 40, जळगाव जामोद 46 असा इतर तालुक्यांतील रुग्णाचा आकडा आहे. याशिवाय देऊळगाव राजा 13, मोताळा 13, सिंदखेडराजा 24, संग्रामपूर 30 या तालुक्यांत कोरोनाचा जोर कमी असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काल, 19 मे रोजी 10 रुग्ण दगावल्याने यंत्रणा हादरल्या होत्या. आज 24 तासांत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले. उपचारादरम्यान पारपेठ मलकापूर येथील 50 वर्षीय महिला, एकलारा (ता. शेगाव) येथील 60 वर्षीय महिला, सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील 55 वर्षीय पुरुष व मेहकर येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
4946 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4946 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 591 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 367 व रॅपीड टेस्टमधील 224 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 952 तर रॅपिड टेस्टमधील 3994 अहवालांचा समावेश आहे.