55 कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला! 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार!! संध्याकाळपर्यंत चालणार नमुने संकलन
बुलडाणा (संजय मोहिते ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना विरुद्धची दुसरी लढाई सुद्धा जिद्दीने लढणाऱ्या बुलडाणा तहसीलमधील कर्मचारी आज, 4 मार्चला पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालयाने 5 रिस्टरचा भूकंप अनुभवला! यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तात्काळ कार्यलय परिसरातच संकलित करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार या कर्मचाऱ्यांचे अहवाल 3 दिवसांनी येणार असल्याने तोपर्यंत या कर्मचाऱ्यावरील धोक्याची तलवार टांगती राहणार आहे.
बुलडाणा तहसीलमधील 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. या परिणामी तहसीलमधील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचे तहसीलमधेच स्वॅब नमुने घेण्यात आले. सकाळी 10 वाजताच्या आसपास सुरू झालेली ही प्रक्रिया संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू राहणार असल्याचे तहसील सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांनी काटेकोर दक्षतेसह स्वॅब घेतले. कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे अहवाल 3 दिवसांनंतर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे कमीअधिक 72 तास या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला आणि त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले राहणार आहेत.
आरोग्य यंत्रणांच्या पथकाने सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तब्बल 55 कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतले. या पाठोपाठ मुख्याधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी स्वप्नील लघाणे, आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल, रियाझ समद यांच्यासह सफाई कामगारांचे पथक रवाना केले. पथकाने सोडियम हायड्रो क्लोराईडची सर्व विभाग, कक्ष व परिसरात फवरणी केली.