मृत्यूचे तांडव सुरूच! सलग दुसऱ्या दिवशी 7 बळी!! आज 879 कोरोना पॉझिटिव्ह; 8 तालुक्यांत थैमान

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तीन अंकी असला तरी खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील कोविड बळींचे तांडव कायम आहे! गत् 24 तासांत 879 बाधित अन् 7 जणांचा मृत्यू असा कोविडचा स्कोअर आहे. सलग दुसऱ्या दिवशी खामगाव सामान्य रुग्णालयातील 5 रुग्णांवर काळाने मात केल्याचे दुर्दैवी चित्र आहे. 3 मे रोजी जिल्ह्यात …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा तीन अंकी असला तरी  खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील कोविड बळींचे तांडव कायम आहे!  गत्‌ 24 तासांत 879 बाधित अन्‌ 7 जणांचा मृत्यू असा कोविडचा स्कोअर आहे. सलग दुसऱ्या दिवशी खामगाव सामान्य रुग्णालयातील 5 रुग्णांवर काळाने मात केल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

3 मे रोजी जिल्ह्यात 8 कोरोना बळींची नोंद झाली होती. त्यात खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 5 दुर्दैवी जिवांचा समावेश होता. आज 4 तारखेला जिल्ह्यातील बळींची संख्या 7 असून, उपचारादरम्यान खल्याळ गव्हाण (ता. देऊळगाव राजा) येथील 70 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 71 वर्षीय पुरुष, सिंधी कॉलनी खामगाव येथील 47 वर्षीय महिला, हिरानगर खामगाव येथील 80 वर्षीय पुरुष, फाटकपुरा खामगाव येथील 40 वर्षीय पुरुष, जनुना (ता. खामगाव) येथील 34 वर्षीय पुरुष, मोदीनगर शेगाव येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांत बुलडाणामधील महिला कोविड रुग्णालय आघाडीवर होते. सलग 2 दिवसांत खामगाव सामान्य रुग्णालयातील 10 पेशंट दगावले. यामुळे यंत्रणा चिंताग्रस्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील कोरोनाच्या थैमानाची यात भर पडली आहे. या तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची रेंज 63 ते 161 अशी बेफाम आहे.

सोमवारी शांत असलेल्या खामगाव तालुक्यात गत्‌ 24 तासांत कोरोनाने पुन्हा उसळी घेत (161 पॉझिटिव्ह) दीडशेचा आकडा ओलांडला! शेजारील शेगावमध्ये 70 रुग्ण आढळलेत. बुलडाणा तालुका  किंबहुना मतदारसंघाला कोरोनाने चांगलाच विळखा घातलाय असे गंभीर चित्र आहे. बुलडाणा तालुका 120 अन्‌ मोताळा 111 रुग्ण असा कोरोनाचा द्विशतकी खेळ आहे. मेहकर, मलकापूर पट्ट्यात कोविडचे तांडव सुरूच आहे. लोणार तालुका 103 ,  मेहकर  80, मलकापूर 67, नांदुरा 63 अशी भयावह आकडेवारी आहे. देऊळगाव राजा 31, चिखली 28, जळगाव जामोद 15, सिंदखेडराजा 26,व संग्रामपूर 4 हे तालुके आज शांत आहेत, हा आज पुरता दिलासा आहे.

2281 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3560 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2281 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 879 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 572 व रॅपीड टेस्टमधील 307 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 420 तर रॅपिड टेस्टमधील 2261 अहवालांचा समावेश आहे.

6217 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आज 1173 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 367168 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 60938 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 6217 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 67589 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 6217 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 434 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.