कृषी सहाय्यक नको, कृषी अधिकारी म्हणा! कृषी सहाय्यकांची मागणी! बुलढाण्यात केले धरणे आंदोलन ....

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी विभागातील विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील ३७४ कृषी सहाय्यकांनी आज जिल्हा कृषी कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
कृषी सहाय्यकांनी पदनाम बदलून “सहाय्यक कृषी अधिकारी” करण्यात यावे, संपूर्ण विभाग डिजिटल झाल्याने लॅपटॉप देण्यात यावेत, आकृतीबंध मंजूर करण्यात यावा, तसेच ग्रामस्तरावर कृषी मदतनीस उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या यावेळी मांडल्या.
या आंदोलनात महिला कृषी सहाय्यकांचाही सक्रिय सहभाग होता. अर्चना वाकोडे यांनी सांगितले की, “खेड्यापाड्यात प्रत्यक्ष शेतीत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डिजिटल कामकाजासाठी लॅपटॉपसारख्या मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत.”
संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे म्हणाले की, “कृषी सहाय्यकांची कामगिरी महत्त्वाची असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलनाची पुढची टप्प्याटप्प्याने योजना आखण्यात आली आहे.”
आंदोलनाची पुढील टप्प्यांतील योजना:
  • कृषी सहाय्यक काळी फित लावून निषेध नोंदवणार
  • शासकीय WhatsApp ग्रुपमधून बाहेर पडणार
  • तालुका कृषी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन
कृषी सहाय्यकांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. शासनाने तातडीने या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.