तुम्ही असाल "लोणीकर"..मी पण "तुपकर"! रविकांत तुपकरांनी बबनराव लोणीकरांना धो–धो धुतले! शेतकऱ्यांविषयी लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र भरात संताप!

 तुपकर म्हणाले, यांना शेतकरी बुटाने हाणतील...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांची बाजू लावून धरत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोणीकरांवर चांगलाच निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांचे उपकार विसरू नका, अन्यथा शेतकरी तुमचं तोंड काळं करतील आणि बुटाने हाणतील,” असा इशारा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  एका व्हिडिओद्वारे दिला.

बबनराव लोणीकर यांनी नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक भाषणात, “शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल, हातातील मोबाइल हे सगळं नरेंद्र मोदींमुळे मिळालं आहे,” असे वक्तव्य केले होते. या विधानावर शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, अनेक नेते आणि संघटनांनी त्याचा निषेध केला आहे.

या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर देताना म्हटले की, बबनराव लोणीकर यांच्या अंगावरील कपडे,  त्यांच्या हातातील मोबाईल, ते रोज जेवतात ते अन्न शेतकऱ्यांमुळेच आहे. मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीही शेतकऱ्यांच्या अंगावर कपडे होतेच, उलट सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकरी काही फुकट खाणारा नाही... शेतकरी पिकवतो, त्यातून सरकारला कर मिळतो आणि त्यातूनच तुमचा पगार होतो. तुम्हीच शेतकऱ्यांच्या जीवावर  सत्ता चालवता.. लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आम्ही त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही.. "तुम्ही लोणीकर असाल तर मी पण तुपकर आहे" , एक पाऊल पुढे आहे.. महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला बूटाने हाणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे..