शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! उद्या आणि परवाचा दिवस धोकादायक; गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी घेरलेला आहे. खरीप हंगामात उत्पादन खर्च वाढला, अपेक्षित उत्पादन झाले नाही, त्यातही मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. भाऊ वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच ठेवली आहे. मात्र त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. अशातच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. हरभरा आणि तूर पिकाकडून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना आता हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..उद्या आणि परवा म्हणजेच २७ – २८ डिसेंबरला मेघगर्जनेसह गारपीट होऊ शकते असा अंदाज आहे..
 हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच २७ डिसेंबरला दुपारी सर्वप्रथम नंदुरबार, धुळे ,जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये पावसाची सुरुवात होईल. उद्या रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात पाऊस हजेरी लावेल. ज्यात बुलडाणा, अमरावती,अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत हा वादळी पाऊस पूर्वेकडे सरकून विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागात येईल. या भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. २९ डिसेंबरला हवामान स्थिर राहणार असून ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल असाही हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामानाच्या स्थितीनुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे. वादळ आल्यास झाडांखाली, टीनाच्या शेडखाली, विज प्रवाह असलेल्या ताराखाली किंवा रोहित्राजवळ थांबू नये असे आवाहन कृषी व हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.