'आता संयम सुटणार?'... धनगर समाजाचा प्रशासनाला इशारा; तीन मोठ्या मागण्यांसाठी आंदोलनाचा एल्गार!
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्यातील हजारो धनगर कुटुंबांचा उदरनिर्वाह मेंढीपालन व्यवसायावर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र पात्र मेंढपाळांना वेळेवर चराई वनपासेस मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वनक्षेत्रात चराई करताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून वारंवार अडविणे, दमदाटी करणे, मानसिक त्रास देणे आणि गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
शासन एका बाजूला पशुपालन आणि मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगत असताना, दुसऱ्या बाजूला वन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे पारंपरिक व्यवसाय करणेही कठीण झाल्याची भावना धनगर समाजाने व्यक्त केली आहे. ही दुटप्पी भूमिका तातडीने थांबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय काही ठिकाणी समाजकंटकांकडून मेंढपाळांवर मारहाण, दमदाटी आणि हल्ल्यांचे प्रकार घडत असल्याचा दावा करत, कायद्यातील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या पात्र मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचा शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धनगर समाजाने प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये सर्व पात्र मेंढपाळांना तात्काळ चराई वनपासेस देणे, वन अधिकाऱ्यांकडून होणारा कथित छळ थांबवून दोषींवर कारवाई करणे आणि पात्र मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची प्रक्रिया सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे.या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण धनगर समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच भविष्यात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.