जुन्या पेन्शनसाठी आमदारकीचे वेतनही स्वीकारणार नाही! दत्तात्रय लहाने यांच्या शपथपत्राची उद्धव ठाकरेंकडून विशेष दखल; ‘शिक्षकांनो, लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’,

 भावनिक पत्रातून शिक्षकांना साद; टप्पा अनुदानाचाही शब्द!

 

आमदारकीचे वेतन न स्वीकारण्याची लेखी हमी; लहाने यांच्या भूमिकेची चर्चा

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी दिली आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी केवळ आश्वासने न देता लेखी वचन देण्याची भूमिका लहाने यांनी घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. तहसीलदारांसमक्ष स्वाक्षरी करून दिलेल्या शपथपत्रात, जोपर्यंत शिक्षकांना जुनी पेन्शन आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू होत नाही, तोपर्यंत आमदार म्हणून मिळणारे वेतन स्वीकारणार नसल्याचे लहाने यांनी म्हटल्याची माहिती ठाकरेंनी दिली.

शिक्षकांच्या प्रश्नांशी बांधिलकी व्यक्त करण्यासाठी घेतलेली ही भूमिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरत आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी स्वतःच्या मानधनाबाबतही अट घालण्याची तयारी दाखवणाऱ्या लहाने यांच्या भूमिकेचा उल्लेख करत ठाकरेंनी त्यांचे कौतुक केले.

‘शब्दाला जागणे हा आमचा संस्कार’; ठाकरेंनी जुन्या पेन्शनच्या वचनाची करून दिली आठवण

उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांना उद्देशून जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिक्षक हे सुज्ञ आणि सुजाण नागरिक घडविणारे मूर्तिकार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगती न करता जबाबदार नागरिक म्हणून घडावे, अशी अपेक्षा प्रत्येक शिक्षकाची असते. समाजासाठी आदर्श घडविणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही आदर्श उमेदवाराची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचा दाखला देत ठाकरे यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावरही भाष्य केले. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात जुनी पेन्शन आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू करण्याचे लेखी मान्य केले होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

“दिलेल्या शब्दाला जागणे हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा संस्कार आहे,” अशी भूमिका मांडत त्यांनी आपल्या पक्षाची बांधिलकी अधोरेखित केली. काही आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे जुन्या पेन्शनच्या आश्वासनाची पूर्तता करता आली नाही, असा दावाही त्यांनी केला. मात्र, शिक्षकांच्या प्रश्नांसाठीचा लढा थांबणार नसल्याचे स्पष्ट करत लहाने यांच्या उमेदवारीचा संदर्भ दिला.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लहाने यांची बांधिलकी अधोरेखित

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न, नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान आणि इतर प्रलंबित मागण्या यांवर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लेखी हमी देण्याची लहाने यांची भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहे.
शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही केवळ आमदार निवडण्यापुरती मर्यादित नसून, शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणारा प्रतिनिधी निवडण्याची संधी असल्याचे ठाकरेंनी आपल्या पत्रातून सूचित केले आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा प्रतिनिधी आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करेल’

दत्तात्रय लहाने यांना क्रमांक एकचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांना केले आहे. लहाने हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एकीकडे जुन्या पेन्शनची मागणी, दुसरीकडे टप्पा अनुदानाचा प्रश्न आणि त्यातच वेतन न स्वीकारण्याबाबत दिलेली लेखी हमी, यामुळे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दत्तात्रय लहाने यांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी आणि कशी पूर्ण होतात, याकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.