बायको अचानक बेपत्ता, नवऱ्याची पोलिसांत धाव! गावात शोधले, नातेवाइकांकडे चौकशी केली, फोनही लावला,पण उचलेना..! पण पत्नीचा थांगपत्ता लागेना! जळगाव जामोद तालुक्यातील घटना..

 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव काळे येथील रहिवासी भगवान लक्ष्मण तायडे (वय ७०, व्यवसाय शेती) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यांची पत्नी शांताबाई भगवान तायडे (वय ६५) या पतीसोबत राहतात. तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास शांताबाई या गावात देवाच्या आरतीसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. सुरुवातीला त्या गावातच कुठेतरी असतील, असे पतीला वाटले. परंतु वेळ जसजशी पुढे जाऊ लागली, तसतशी त्यांच्या मनातील चिंता वाढू लागली.

गाव पालथे घातले, नातेवाइकांकडे चौकशी; तरीही पत्नीचा पत्ता नाही!

पत्नी घरी न परतल्याने भगवान तायडे यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी गावातील विविध ठिकाणी जाऊन चौकशी केली. पत्नी कुणाकडे गेली असेल का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाइकांकडेही विचारपूस केली. मात्र, शांताबाई यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, भगवान तायडे यांनी पत्नीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. गावात आणि नातेवाइकांकडे शोध घेऊनही पत्नीचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांनी अखेर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला.

आरतीसाठी घराबाहेर पडलेल्या शांताबाई नेमक्या गेल्या कुठे?

१८ ऑक्टोबरच्या सकाळी घराबाहेर पडलेल्या शांताबाई अद्याप घरी परतलेल्या नसल्याचे पतीने तक्रारीत म्हटले आहे. त्या नेमक्या कुठे गेल्या, त्यांच्याशी संपर्क का होत नाही, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तक्रारीनुसार, शांताबाई यांचे वय ६५ वर्षे असून, त्यांचा रंग गोरा, उंची अंदाजे पाच फूट चार इंच, अंगात हिरव्या रंगाची साडी आणि केस लांब आहेत. अशा वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, पत्नीचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने भगवान तायडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून बेपत्ता महिलेचा शोध घेतला जात आहे.सकाळी देवाच्या आरतीसाठी घराबाहेर पडलेली पत्नी पुन्हा घरी परतली नसल्याने वृद्ध पती चिंतेत आहे. शांताबाई यांचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.