शेतकरी संकटात असताना सणांची उधळपट्टी कशाला?; संजय गायकवाडांचा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी!
आमदारांचे रोखठोक आवाहन : अधिकारी-कर्मचारी, मंत्री आणि इतर आमदारांनीही पुढे यावे; “शेतकऱ्यांची दिवाळी होत नसेल, तर आपणही साधेपणाने सण साजरे करूया”
“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात राबतो, पीक पिकवतो आणि म्हणूनच आपल्या ताटात अन्न येते. आज तोच शेतकरी संकटात असताना आपण मात्र पैशांची उधळपट्टी करून सण साजरे करणे कितपत योग्य आहे?” असा सवाल आमदार गायकवाड यांनी केला.
शेतकऱ्यांची दिवाळी होत नसेल तर आपणही साधेपणाने सण साजरे करूया!
येत्या दिवाळीसह इतर सणांमध्येही शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा आनंद नसेल, तर आपणही यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करून त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
“माझा एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी देणार”
आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेत “माझा एक महिन्याचा पगार मी शेतकऱ्यांसाठी जमा करणार आहे,” असे स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यातील इतर आमदार, मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आपला एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी देण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारवर आर्थिक भार; समाजानेही पुढे येण्याची गरज
शेतकऱ्यांवरील संकट मोठे आहे. सरकारने नुकतीच कर्जमाफी केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध योजनांमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. त्यामुळे सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवतानाच समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
“शेतकरी वाचवायचा असेल तर प्रत्येकाने योगदान द्यावे”
“आपले सरकार, आपला देश आणि आपला शेतकरी वाचवायचा असेल, तर या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले पाहिजे. आमदार, मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी दिला पाहिजे,” असे रोखठोक आवाहन संजय गायकवाड यांनी केले.
शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात स्वतःचा एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा करून आमदार गायकवाड यांनी इतर लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेपुढेही मदतीचा मुद्दा ठेवला आहे. आता त्यांच्या या आवाहनाला इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.