उशीरा का हाेईना, कर्जमाफीवर बाेलायला लागले आहेत! महादेव जानकर यांचा सत्ताधाऱ्यांना टाेला; साखरखेर्डा व शिंदी परिसरात नुकसानीची केली पाहणी!

 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घाेषणा केली हाेती. आता उशीरा का हाईना कर्जमाफी करताे म्हणून सत्ताधारी बाेलायला लागले आहेत, असा टाेला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावला.
 साखरखेर्डा आणि शिंदी परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी जानकर यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. 
 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात कोण लोकप्रतिनिधी आहे, यापेक्षा लोकांच्या अडी अडचणी कोण सोडवितो याकडे जनता डोळस नजरेतून पाहात असते. या भागातील शेतकरी संकटात सापडलेला असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे करून शासनाकडे पाठवावे. त्याचा पाठपुरावा निश्चित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार अजित दिवटे यांना फोन करून शेतकऱ्यांच्या वतीने संभाषण केले . 
शिंदी येथील काही शेतकऱ्यांच्या शेती मेरा बु .शिवारात असून या शेतात पराड्याचे पाणी वाहात येऊन शेतात शिरले. त्यामुळे जमीनी खरडल्या , पिके वाहून गेली. शिंदी येथील गावात पाणी शिरल्याने ४० ते ५० घरांचे नुकसान झाले . आजही अनेकांच्या शेतात पाणी साचलेले आहे. सोयाबीन शेंगावर बुरशी वाढल्याने शेंगा काळ्या पडून गळती लागली आहे . एकरी एक क्विंटल उत्पादन सुध्दा निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी व्यथा यावेळी रमेश खरात , नितेश खरात , मंगेश बंगाळे , संतोष खरात , राहुल खंडारे , किरण खंडारे , सुनील खंडारे , रतन खंडारे , आप्पा आटोळे , विशाल आटोळे यांनी जानकर यांच्याकडे मांडली . 
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तौसीफ शेख , प्रदेश सचिव संजय कन्नावार, नरेश मंडल , जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड, संपर्क प्रमुख अतुल भुसारी, तालुका अध्यक्ष संतोष वनवे, सचिन खंडारे, देवानंद खंडागळे, अमित जाधव यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .