प्राथमिक शिक्षक होण्याचे स्वप्न कुणाचे होणार साकार? टीईटी परीक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज!२८ जूनला केंद्रात ७ हजार १७४ उमेदवार देणार परीक्षा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्राथमिक शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेली शिक्षक पात्रता परीक्षा या महिन्यात होणार आहे. २८ जूनला होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने चांगली पूर्वतयारी केली आहे. बुलढाणा शहर आणि परिसरातील २२ सेंटर या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यातून ७ हजार १७४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत...
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेली ही परीक्षा पारदर्शक निःपक्षपाती आणि कॉफीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने टीईटी परीक्षा आयोजन व संयंत्रण समितीची बैठकही जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
सर्व केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी, आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त असावा.. गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा कोषागार विशेष व्यवस्था तसेच आवश्यक कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. परीक्षेच्या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी असे निर्देशही डॉ.देवरे यांनी दिले. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या प्रतिनिधीसह माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी तसेच जिल्हा कोषागार अधिकारी राठोड उपस्थित होते.