देऊळगावमहीच्या क्रीडांगणावर कोण करतयं चुकीचं काम? तरुणांचे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन!त्या भामट्यांवर फौजदारी कारवाई करा म्हणाले....

 
 देऊळगाव मही(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील तरुणांनी ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले..अर्थात त्याचे कारणही तसेच आहे.. देऊळगावमही येथे राजमाता मासाहेब जिजाऊ हे एकमेव भव्य असे क्रीडांगण आहे. मात्र या क्रीडांगणावर काही विघ्नसंतोषी लोक वेगवेगळ्या प्रकारचे गैरकृत्य करतात, ज्यामुळे खेळाडूंना मोठा अडथळा निर्माण होतो, शिवाय मैदानाचेही वारंवार नुकसान होते. त्यामुळे मैदानावर गैरकृत्य करण्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमांतून खेळाडूंनी, तरुणांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे.

खरे तर हे मैदान खेळण्यासाठी, पोलीस किंवा आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी आहे.मात्र या मैदानावर कुणी नांगरतात, कुणी मळणी यंत्र चालवते तर कुणी चार चाकी वाहन घेऊन फिरवते. यामुळे मैदानावर झालेल्या सपाटीकरणाला गड्डे पडतात. अशाने जे खेळाडू सराव करतात त्यांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या खेळाच्या मैदानावर अतिक्रमण करणाऱ्यांवर, चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. मैदानाच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाने उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे.