ऐन सणासुदीला रेशनमधून गहू गायब! सरकारच्या निर्णयामुळे गोरगरीबांची कोंडी; जिल्हाभरात सण, उत्सवाला केवळ ज्वारी आणि तांदळाचेच हाेतेय वितरण !
Aug 26, 2025, 20:12 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सध्या सण उत्सवाची रेलचेल सुरू आहे. मात्र, सण उत्सवाच्या काळातच रेशनमधून गहु गायब झाल्याचे चित्र आहे.
गणपती, महालक्ष्मी, नवरात्रोत्सवासारख्या पवित्र सणाच्या उंबरठ्यावर गोरगरीब लाभार्थ्यांना गव्हापासून वंचित राहावे लागणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधून सप्टेंबर महिन्यात फक्त ज्वारी आणि तांदूळच मिळणार असून गव्हाचे वितरण होणार नाही, अशी माहिती आहे. हे चित्र मलकापूर तालुक्यासह जिल्हाभरात आहे.
मे २०२५ मध्ये केंद्र व राज्य सरकारने युध्दजन्य परिस्थिती आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीचा हवाला देत जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे धान्य एकदाच देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे त्या वेळी लाभार्थ्यांना एकावेळी मोठा साठा मिळाला, पण आता सप्टेंबर महिन्यात सणासुदीच्या काळात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात हिंदूंच्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गव्हाचे महत्त्व लक्षात घेता हा निर्णय गोरगरीबांच्या जिव्हारी लागणारा आहे. गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीवर भागवावे लागणे हा शासनाच्या नियोजनातील घोटाळा असल्याची चर्चा जनतेत सुरू झाली आहे.
मलकापूर तालुका पुरवठा अधिकारी धनश्री हरणे यांनी सांगितले की, "सप्टेंबर महिन्यासाठी गव्हाचा साठा मंजूर नाही. फक्त ज्वारी आणि तांदूळच उपलब्ध करून दिले जात आहे. शासनाच्या पुढील आदेशानंतरच गव्हाचे वितरण होईल." मात्र, आदेश कधी येणार याबाबत कोणतीही खात्री नाही.
