कारागृहातून मुक्त झाल्यावर काय करायचे? जिल्हा कारागृहातील ट्रेनिंग..! कैद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....

 
 बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):कारागृहातुन मुक्त झाल्यानंतर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येथील सेंट ग्रामिण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातुन दि. १६ डिसेंबरपासुन सहा दिवसांचे फास्ट फुड उद्यमी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसादपणे सहभागी नोंदविला.

 बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये ३२३ न्यायाधिन बंदी बंदीस्त आहे. या बदीस्त बंद्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत असून पहिल्या तुकडीमध्ये ३२ बंद्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला आहे. कोल्हापुर येथील प्रशिक्षक तृप्ती धिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरु झालेले आहे. सदर प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी बंद्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच बंद्यांना भविष्यात उपजिवीकेसाठी निश्चितच फायदा होणार आहे. सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचे मार्फत कारागृहामध्ये बंद्यांकरीता पुढील प्रशिक्षण शिबिरामध्ये नर्सिग कोर्स, टेलरींग कोर्स, मोटार रिवायडींग असे विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहेत. 
  या उपक्रमामध्ये अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक प्रशांत बुरडे, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे व विशेष पोलीस महानिरीक्षक(मुख्यालय) जालिंदर सुपेकर, कारागृह व सुधारसेवा व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरीता कारागृह अधीक्षक संदीप पां. भुतेकर, वरीष्ठ तुरंगाधिकारी मेघा बाहेकर, सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्थाचे संचालक संदीप पोटे, फॅकल्टी स्वनील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक प्रशांत उबरहांडे, मनिषा देव तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले...