हा असा कसा ग्रामसेवक? काम करत नाही, नियमित कार्यालयात येत नाही; विवाह नोंदणीसाठी घेतो पैसे,पावती देत नाही! दोन मुले डेंग्यूने वारली तरी सांडपाण्याचे नियोजन नाही!

 असोला बु च्या सदस्यांची बिडीओकडे तक्रार! बदली करा म्हणाले....
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मेरा खु जवळ असलेल्या असोला बु येथील ग्रामपंचायत चा ग्रामसेवक बिनकामाचा असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांची आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी उठाव करून ग्रामसेवकाची तक्रार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. असोला बु ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संतोष सवडतकर हे मनमानी कारभार करतात. नियमित कार्यालयात हजर राहत नाहीत. विकास कामांबाबत वारंवार सांगून देखील कोणतीही अंमलबजावणी होत नाही अशी ग्रामपंचायत सदस्यांची तक्रार आहे..
     
   ग्रामसेवक सवडतकर नियमित कार्यालयावर हजर राहत नाही.
 गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत वारंवार सांगून सुद्धा कोणत्याही स्थळावर कार्यवाही अद्याप केलेली नाही. त्यामुळे गावामध्ये डेंगूसारखे आजार पसरत आहे. गावातील सांडपाण्याची व्यवस्था न लावल्याने डेंगूच्या आजाराने दोन मुले दगावली. त्यामुळे गावातील लोकांचा राग ग्रामपंचायतीवर व सदस्यावर काढल्या जातो असेही सदस्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ग्रामसेवक पाणी पट्टी घर पट्टी वसुलीसाठी गावात फिरत नाही व वसुलीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न करत नाही. घर पट्टी व पाणी पट्टी २ महिन्यापूर्वी वसूल करून सुद्धा आज पर्यंत खात्यात भरणा केला नाही असा गंभीर आरोप देखील ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.शासकीय योजना, नव्याने येणारे शासन निर्णय ग्रामस्थापर्यंत तसेच ग्रामसभेत मासिक सभेत पोचवत नाहीत किंवा त्याबाबत ग्रामस्थांना माहिती देत नाही अशीही तक्रार आहे. महिला व बाल ग्रामसभा घेण्याबाबत वारंवार सांगून सुद्धा सभा घेत नाही सभेबाबत उदासीनता दिसून येते. ग्राम स्वच्छता अभियान दर महिन्याच्या १२ व १३ तारखेस राबविण्याबाबत सर्वानुमते ठरले असून ते हजर राहत नाही असाही आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात २ ते ३ दिवसानंतर १ वेळा येतात आल्यास जास्तीत जास्त १ तासाच्या वर थांबत नाही.
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी घेतात पैसे...
ग्रामसेवक सवडतकर विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ५०० ते ७०० रुपये घेऊन त्यांना कोणतेही पावती देत नाही असाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दर महिन्यानंतर मासिक सभा घेणे आवश्यक असून सुद्धा ३ ते ४ महिन्यानंतर मासिक सभा घेतात. कोणतेही ठराव घेतेवेळी सर्व सदस्य यांना विचारात घेऊनच ठराव घेणे आवश्यक आहे. परंतु सरपंच व ग्रामसेवक हे संगनमत करून इतर सदस्य यांना विचारात न घेता ठराव परस्पर घेतात.ग्रामसेवक संतोष सवडतकर हे असोला बु. ग्रामपंचायत मध्ये गेल्या ८ ते १० वर्षपासून ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे, त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. तक्रारीवर उपसरपंच साहेबराव पांडुरंग पवार, ग्रामपंचायत सदस्य शोभा गजानन गवई, मनिषा आकाशकुमार राठोड, रिजवाना परवीन कडू खान, जयश्री सचिन चव्हाण, अनिल रूपा चव्हाण, शरद अशोक गोलांडे आदींच्या सह्या आहेत...