

EXCLUSIVE काय साहेब, असं असतं का? आरोग्याची लावली वाट! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चुकीच केलं! पात्रतेचे निकष डावलून सोपवला मोताळ्याच्या तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार...
Apr 15, 2025, 17:24 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आरोग्य व्यवस्था म्हणजे निरोगी आणि निकोप समाजव्यवस्थेचा कणा...मात्र या व्यवस्थेला खिळखिळी करण्याचं काम काही लोकांकडून होतय.. होय...चक्क जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा "बॉस" समजल्या जाणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनीच चुकीचं केलं तर विश्वास ठेवावा तरी कुणावर? तुम्ही म्हणाल असं काय चुकीच झालं..तर थोड थांबा..ही बातमी पूर्ण वाचा..त्याच झाल असं की, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पात्रतेचे निकष डावलून चुकीच्या व्यक्तीवर महत्वाचा पदभार सोपवला आहे. मोताळ्याच्या तालुका आरोग्य अधिकारी पदाचा पदभार सोपवतांना जिल्हा अधिकाऱ्यांनी नियम डावलून नियुक्ती केल्याचा आरोप होतोय..
मागील महिन्यात ३ मार्चला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी देऊळगाव राजा आणि मोताळा येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या स्वाक्षरीने देऊळगाव राजाची जबाबदारी डॉ.किशोर गीते तर मोताळा येथील जबाबदारी डॉ.अमित बामरटकर यांना सोपविण्यात आली. मात्र दोन्ही ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता बीएएमएस असल्याचे समजते. त्याठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे इतर उमेदवार असताना देखील या नियुक्त्या केल्याने संशय निर्माण होणे स्वाभाविक आहे.
तसे पाहता तालुका वैद्यकीय अधिकारी हे आरोग्य यंत्रणेतील अतिशय जबाबदारीचे काम आहे. मात्र हे जबाबदारीचे काम देताना निकष डावलण्यात आल्याने आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, देऊळगावराजात कुणी एमबीबीएस नव्हते आणि मोताळ्यात एमबीबीएस या शैक्षणिक पात्रतेचे असले तरी तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार घेण्यास ते इच्छुक नव्हते असे सांगण्यात आले.
कुणी पात्रता धारक इच्छुक असल्यास सध्या केलेली नियुक्ती रद्द करुन पात्र व्यक्तीस नियुक्ती देण्यात येईल असेही जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले होते. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने फेरतपासणी केली असता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मोताळ्या संदर्भात कुणी इच्छुक नसल्याचा केलेला दावा चुकीचा आढळून आला आहे. त्यामुळे आता तालुका आरोग्य अधिकारी पदाची नव्याने जबाबदारी देण्यात येते की पात्रता डावलून केलेल्या नियुक्त्या कायम ठेवण्यात येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..