जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकेत; जिल्ह्यातील प्रकल्पात ४४.१६ टक्के जलसाठा शिल्लक
Mar 12, 2025, 13:41 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गत् वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील काही भाग वगळता मोठे, मध्यम व अनेक लहान प्रकल्प तुडूंब भरले होते. यावर्षी उन्हाळाभर पाणी पुरेल, अशी शक्यता होती. परंतु, मागील काही दिवसापासून होत असलेला पाण्याचा भरमसाठ उपसा तसेच उन्हामुळे होत असलेले पाण्याचे बाष्पीभवन, दिवसागणिक भूगर्भातील खोल जात असलेली पाणीपातळी यासह इतर कारणामुळे एका आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यापैकी १९ दलघमी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील ३ मोठे, ७ मध्यम व ४१ लघू प्रकल्पांत केवळ ४४.१६ टक्के जलसाठा शिल्लक असून एप्रिल, मे व जून महिन्यात तिव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.यावर्षी जिल्ह्यात मार्च -एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टंचाईतून सुटका झाली असली तरी अनेक भागात तिव्र पाणीइंचाई निर्माण झाली आहे.
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे, पारडी, वरवंड व जवळा या गावांसाठी टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे. याशिवाय पाण्याचा मोठ्या प्रमाणात वाढलेला वापर, पाण्याचे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे मोठे, मध्यम व लहान प्रकल्पातील जलसाठा कमी झाला आहे. यावर्षी जलसंपदा विभागानेही पाण्याचे नियोजन केल्यामुळे अनेक प्रकल्पातील जलसाठा किमान पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. परंतु, नागरिकांनी पाण्याचा वापर काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात एकूण ४४.१६ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातून मोठा प्रकल्प असलेल्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४४.३६ दलघमी असून त्याची टक्केवारी ६३.९९ आहे, मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३३.९० दलघमी असून त्याची टक्केवारी ५६.५२ देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २७.२२ दलघमी असून त्याची टक्केवारी २९.१४ एवढी आहे. तसेच मध्यम प्रकल्प असलेल्या पलढग प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ८.३३० असून त्याची टक्केवारी ५५.३९ एवढी आहे. ज्ञानगंगा प्रकल्पातील जलसाठा २६.१५२ असून त्याची टक्केवारी ७७.०८, मस प्रकल्पातील जलसाठा ८.३३० असून त्याची टक्केवारी ५५.३९, कोराडी प्रकल्पात ४.६८० दलघमी साठा असून त्याची टक्केवारी ३०.९५, मन प्रकल्पातील जलसाठा १८.६९० असून त्याची टक्केवारी ५०.७५, तोरणा प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २.२८० असून त्याची टक्केवारी २८.९० तर उतावळी प्रकल्पात ९.२५० दघमी साठा असून त्याची टक्केवारी ४६.७४ एवढी आहे.
गावांची संख्या वाढल्याने बुलढाण्यातील पाणीपुरवठा प्रभावित
जवळपास सव्वा लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहरासह परिसरातील काही खेेडेगावांना येळगाव धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सध्यास्थीतीत येळगाव धरणात ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यातच सागवान, भादोला, येळगाव, सुंदरखेड, पिंपरखेड, डोंगरखंडाळा आदी गावांना येळगाव धरणातून पाणी वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे येळगाव धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून बुलढाणा शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे बुलढाणा शहरवासीयांना आठ दिवस पाणी पुरविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येळगाव धरणावरून पाणी पुरवठा सुरू असलेल्या इतर गावांना खडकपूर्णा धरणातून पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
सिंचन व पाणीपुरवठ्यासाठी प्रकल्पांची मोलाची भूमिका
जिल्ह्यात एकूण सात मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत एकूण पाणीसाठा २१४.३८३ दलघमी असून त्याची टक्केवारी ४४.१६ आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मध्यम व लघु प्रकल्पात मुबलक प्रमाणात जलसंचय झाला असून यामधून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी पाणी आरक्षित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त विविध गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठीही हे प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहेत.