पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामस्थांच्या हाती; जिल्ह्यात ८ ते २२ मार्चदरम्यान जल उत्सव बुलढाणा जिल्ह्यात ‘जल उत्सवा’ची सुरुवात; साखळी खुर्द व गारगुंडी येथे ‘जल अर्पण’ सोहळा...
Mar 16, 2026, 19:35 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे व्यवस्थापन ग्रामस्थांच्या हाती सोपवण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘जल उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे १७ मार्च रोजी तर देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथे १८ मार्च रोजी ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.
ग्रामीण भारतात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना उभारण्यात आल्या आहेत. या योजना आता पूर्णत्वाकडे जात असून त्यांचे संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच ग्रामस्थांच्या हाती सोपवण्याचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ८ ते २२ मार्च या कालावधीत देशभरात ‘जल उत्सव’ साजरा केला जात आहे.
या उपक्रमासाठी तांत्रिक आणि संस्थात्मक पूर्वतयारीवर विशेष भर देण्यात आला आहे. ज्या गावांना ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजनेची १५ ते ३० दिवसांची चाचणी घेणे, योजनेतील विविध घटकांची पडताळणी करणे, फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी गुणवत्तेची तपासणी करणे आणि सर्व आवश्यक दस्तऐवजीकरण पूर्ण करणे अशा प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता समिती कार्यान्वित करणे, बँक खाते उघडणे, ऑपरेटर आणि ‘नल जल मित्र’ यांचे प्रशिक्षण देणे तसेच जलस्रोत शाश्वततेसाठी आराखडा तयार करण्यावरही भर देण्यात आला आहे.
‘जल उत्सवा’च्या निमित्ताने विविध जनजागृती उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. ग्रामसभा, पीआरए (PRA) उपक्रम, सुरक्षित पाणी व्यवस्थापनासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि युवकांचा सहभाग, तसेच शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. साखळी खुर्द आणि गारगुंडी येथे जलपूजन, नळपूजन, जल प्रतिज्ञा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
साखळी खुर्दचे सरपंच पंडित बळीराम हिवाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी ज्योती मगर तसेच गारगुंडीचे सरपंच गजानन काकड आणि ग्रामपंचायत अधिकारी नितीन अंभोरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख आणि कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत असून संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंते या उपक्रमात सक्रिय योगदान देत आहेत. या जल उत्सवामुळे ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढून ग्रामस्थ स्वतःच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे संरक्षक बनतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.