पाणीच पाणी चोहीकडे, मोठ्या प्रकल्पांमध्ये ८७ टक्के जलसाठा! अमरावती विभागात जलसंपदा तुडुंब; बुलडाण्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली...

 
KhadKpurna
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):गेल्या दोन दिवसात संततधार पाऊस झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी का होईना निकाली निघाला असून अमरावती विभागात देखील जलसंपदा तुडुंब झाली आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यात मोठे ,मध्यम व लघु असे एकूण २८९ जलसाठा प्रकल्पांमध्ये ३१०२.४० प्रकल्पीय संकल्पित क्षमतेच्या तुलनेत सद्यस्थितीत २५१७.०२ दलघमी आजचा पाणीसाठा असून याची टक्केवारी ही ८१.१३ इतकी आहे.
गत आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात मृतसाठ्यात असलेले प्रकल्प दोन दिवसात झालेल्या पावसाने ओव्हरप्लो झाले आहेत. काही तालुक्यांमधील महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद देखील झाली आहे. जलसाठा प्रकल्पांची एकूण स्थिती सध्या समाधानकारक असली तरीही शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने तात्काळ सर्वेक्षण होऊन मदतीची अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे. अमरावती विभागात येणाऱ्या ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ८६.९९ टक्के जलसाठा आहे. यामध्ये १३९९.९२ दलघमी प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा च्या तुलनेत सध्या १२१७.८२ दलघणी उपयुक्त पाणीसाठा आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील सहा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा ९२.९७ टक्के जलसाठा आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प (९९.२६ टक्के ), अरुणावती ( ९६.०९) व बेंबळा ( ६०.८९), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (९६.६०), वान ( ८६.२०) तर बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा ( ७२.०३), पेनटाकळी( ८२.६८) व खडकपूर्णा या प्रकल्पामध्ये ७३.५३ टक्के जलसाठा आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात गतवर्षी ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत केवळ ४.३२ टक्के पाणी साचले होते. यंदा गत आठवड्या पर्यंत हा प्रकल्प मृत साठ्यात होता. मात्र दोन ते तीन दिवसात झालेल्या पावसाने खडकपूर्णाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.
१३ मध्यम प्रकल्पही ओव्हर फ्लो...
सोबतच विभागात असलेल्या २७ मध्यम प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा , गोकी , वाघाडी, बोरगाव, नवरगाव, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा मोरणा , उमा तसेच वाशिम मधील सोनल व एकबुर्जी आणि बुलढाणा जिल्ह्यातील पलढग, मस , उतावळी हे तेरा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून त्यातून पाणी विसर्ग सुरू आहे. विभागातील सर्वच मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरीच्या ८० टक्के साठा आहे . तर २५३ लघु प्रकल्पांची स्थिती देखील समाधानकारक आहे यात एकूण ७३.०७ टक्के पाणी साचले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली आहे.