

पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम शेतकऱ्यांना करणार समृद्ध; जिल्ह्यात १०९ धरणातील गाळ काढून शेतात टाकणार; गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश....
Mar 25, 2025, 20:28 IST
बुलडाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा)संपूर्ण राज्यात "पाणी आडवा, पाणी जिरवा" या योजनेंतर्गत जलसंधारणाच्या कामाला सर्वत्र सुरुवात झालेली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असणारे धरण, नद्या नाले यांचे सर्वेचे काम पूर्ण करण्यात आले असून यातील गाळ काढण्याच्या कामास प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
महाराष्ट्राला पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी व "सुजलाम सुफलाम होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात 'पाणी आडवा पाणी जिरवा" ही योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्यात आलेली असून यासाठी वेगळ्या निधीची राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवली आहे. यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने ठीक ठिकाणाचे धरणातील गाळ काढण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत असून लहान मोठी धरणे, नद्या, नाले यातील गाळ काढून सिंचन क्षमता वाढवण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये सद्यास्थितीत विविध १०९ लहान मोठ्या धरणातील गाळ काढण्याचे निश्चिती केली असून प्रत्यक्षात ३२ कामांचे कार्यारंभ आदेश एजन्सीला देण्यात आलेले आहे. उर्वरित कामाचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गाळ काढणे अपेक्षित आहे, अशा ग्रामपंचायतीची माहिती मृद व जलसंधारण विभाग व भारतीय संघटनेचे पदाधिकारी यांना देण्याबाबतचे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले.
यावेळी बीजेएसचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन सुजलाम सुफलामचे माजी अध्यक्ष राजेश देशलहरा, पश्चिम विदर्भ अध्यक्ष कीर्तीकुमार वायकोस, जिल्हाध्यक्ष मंगलचंद कोठारी, सुजलाम सुफलामचे जिल्हाध्यक्ष विनोद कुमार सुराणा, देऊळगाव राजाचे शहराध्यक्ष पियुष खडकपूरकर मुन्ना बेगानी उपस्थित होते.