ज्ञानगंगा अभयारण्यात ‘वाघोबा’ची गर्जना! ‘पीकेटी-७-सीपी-१’ या नर वाघाचे यशस्वी पुनर्वसन
Jan 5, 2026, 11:24 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्याच्या समृद्ध वनसंपदेच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला असून, ज्ञानगंगा अभयारण्यात आता वाघाची डरकाळी ऐकू येणार आहे. वन्यजीव अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असलेल्या वाघाचे पुनर्वसन ३ जानेवारीच्या मध्यरात्री यशस्वीरीत्या करण्यात आले. त्यामुळे बुलढाणा–खामगाव मार्गावरील बोथा घाट परिसरात ‘वाघोबा’च्या अस्तित्वाने जंगल पुन्हा जिवंत झाले आहे.
पांढरकवडा (यवतमाळ) येथे जन्मलेला आणि पेंच व्याघ्र प्रकल्प (नागपूर) येथे वाढलेला ‘पीकेटी-७-सीपी-१’ नावाचा तीन वर्षांचा नर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात मुक्त करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाचे पुनर्वसन करण्याचा हा महत्त्वाकांक्षी टप्पा वनविभागाने यशस्वीरीत्या पार पाडल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१३०० किमीचा प्रवास, तरीही स्थैर्य नाही
यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून ‘सी-१’ हा वाघ तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला होता. अजिंठा पर्वतरांगांमधून भ्रमंती करत तो या जंगलात परत आला; मात्र तो येथे स्थिरावला नाही. प्रौढ अवस्थेतील हा वाघ मादीच्या शोधात सातपुडा परिसराकडे निघून गेला. त्यानंतर ज्ञानगंगा अभयारण्यात स्वतंत्रपणे नर वाघाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला.
आईच्या मृत्यूनंतर पेंचमध्ये संगोपन
नवीन पुनर्वसित नर वाघ मूळचा पांढरकवडा (यवतमाळ) येथील आहे. अवघ्या सहा महिन्यांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाल्याने या वाघासह त्याच्या बहिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत या दोन्ही वाघांनी नैसर्गिक अधिवासात शिकार करणे, संरक्षण व जगण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्ये आत्मसात केली आहेत. पूर्णतः सक्षम झाल्यानंतर या नर वाघाचे ज्ञानगंगा अभयारण्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याची बहीण (मादी वाघ) पैनगंगा अभयारण्यात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कडक सुरक्षा व सतत देखरेख
वाघाला सुरुवातीला अभयारण्यातील पाच हेक्टरच्या विशेष संरक्षित क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही व ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
वाघांसाठी पोषक अधिवास
२०५ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेले ज्ञानगंगा अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी अत्यंत पोषक मानले जाते. येथे रोही, रानडुक्कर, सांबर, भेडकी, काळवीट, मोर यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांची मुबलक संख्या आहे. अभयारण्यात असलेले ‘देव्हारी’ गाव पूर्णतः पुनर्वसित झाल्याने या भागात मानवी हस्तक्षेप शून्यावर आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये ‘टी-१-सी-१’ या वाघाने सुमारे नऊ महिने येथे वास्तव्य केले होते, त्यामुळे हे क्षेत्र वाघांसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
या अधिकाऱ्यांची होती उपस्थिती
वाघाच्या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी नागुलवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवि खोब्रागडे, सहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे व प्रकाश सावळे, तसेच संजय राठोड, श्रीकृष्ण बोबडे, अरुण घुईकर, समाधान गुगळे यांच्यासह वनरक्षक व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
