

बुलढाण्यातील पत्रकार भवनात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Apr 14, 2025, 15:51 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगभरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, बुलढाणा शहरातील पत्रकार भवनात सोमवारी दुपारी पत्रकारांनी अभिवादन कार्यक्रम घेतला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. दरम्यान, उपस्थित पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करित कार्यक्रमाला सुरुवात झाली. अरुण जैन व राजेंद्र काळे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मुकनायक वृत्तपत्राद्वारे बाबासाहेबांनी पत्रकारितेला दिशा दिली. समाजव्यवस्थेत परिवर्तन घडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखनी झिजवल्याचे सांगत, त्यांच्या जयंतीदिनी वृत्तदर्पण सदराचे हजार भाग पूर्ण होणे, माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे काळे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा या जगात कुणी विद्वान झाला नाही आणि होणार नाही असे प्रतिपादन पत्रकार अरुण जैन यांनी केले.
यानंतर, उपस्थित पत्रकारांनी पुष्प अर्पण करित सामूहिक अभिवादन केले. यावेळी राजेंद्र काळे यांच्या वृत्तदर्पण या सदराचे १ हजार भाग पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा अनिल म्हस्के व उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, गजानन धांडे, नितीन शिरसाट, नितीन कानडजे, संदीप वंत्रोले, रहेमत अली शाह, शौकत शाह, राहुल रींढे, अक्षय थिगळे आदी पत्रकार हजर होते. सूत्रसंचालन अभिषेक वरपे यांनी केले.