गावकऱ्यांनो, जिल्हा परिषदेची शाळा वाचवा हो! सरंबा सरपंच संजय चेके आर्त हाक; पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांचा कर माफ करणार ग्रामपंचायत... ग्रामसभेत अनोखा ठराव!

 
 देऊळगाव मही(वैभव देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिवसेंदिवस इंग्रजी, कॉन्व्हेंट शाळांचे वेड वाढतं आहे..मात्र दुसरीकडे ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत.. अशा परिस्थितीत गावची जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी देऊळगावराजा तालुक्यातील सरंबा ग्रामपंचायत ने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी सरपंच संजय तेजराव चेके यांनी गावकऱ्यांना आर्त साद घातली आहे. ग्रामसभेत एक अनोखा ठराव घेण्यात आला आहे, त्यानुसार सरंबा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कर माफ करण्यात येणार आहे...
 
  सरंबा येथे जिल्हा परिषदेची दर्जेदार शाळा आहे. मात्र इंग्रजी शाळांच्या वेडापाई पालक जास्तीचा खर्च करून इंग्रजी शाळांना प्राधान्य देतात. मात्र आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेतून दर्जेदार माणसं घडली आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव समृद्ध होतात.. समाजासाठी जगायचे असते ही शिकवण जिल्हा परिषदेची शाळाच देऊ शकते..जिल्हा परिषदेची शाळा माणूस घडवते तर व्यावसायिक शाळा केवळ पैसे कमावण्याचे मशीन...त्यामुळे सरंबा येथील जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी सरपंच संजय चके व ग्रामपंचायत ने पुढाकार घेतला आहे. पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कर माफ करण्यात येण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.. ग्रामसभेला सरपंच संजय चेके यांच्यासह ग्रामसेवक गणेश तायडे, उपसरपंच रामदास बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य रेखा शिवाजीचे के, कोमल गजानन चिके, श्रीया कैलास नागरे, छाया विलास बनसोडे, समाधान केशव चेके, रेणुका श्रीकृष्ण चेके, सुनिता श्रीकृष्ण चेके आदींसह गावकरी उपस्थित होते....