बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्वाची बातमी! एजंटच्या नादी लागू नका...बातमी वाचा, सगळ लक्षात येईल....
Sep 5, 2024, 20:29 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बांधकाम कामगारा यांच्या नोंदणी ,नुतणीकरण ,लाभ वाटप बाबत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांनी नोंदणी करुन घ्यावे. त्यासाठी पुढीलप्रमाणे नोंदणीची पात्रता निकष लक्षात घ्यावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी बुलडाणा यांनी केले आहे.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांनी नोंदणी करू शकतात. मागील बारा महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे- अर्जदार पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा (आधार कार्ड), ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, मंडळात नोंदणी करण्याकरीता मंडळाच्या iwbms.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन वरीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
नोंदणी फी फक्त १ रुपये असून नुतनीकरण वार्षिक वर्गणी १ रुपये आहे. याबबत जे बांधकाम कामगार मागील एक वर्षामध्ये किमान ९० दिवस इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम केले असल्याचे प्रमाणपत्राच्या आधारे वय वर्ष १८ ते ६० वयोगटामधील व्यक्तींना मंडळाअंतर्गत बांधकाम कामगार म्हणून नोंदित करून घेतले जाते. सदरची नोंदणी एक वर्षापर्यंत ग्राह्य धरण्यात येते व किमान ९० दिवस कामाच्या प्रमाणपत्राच्या आधारे सदर व्यक्तीचे सदस्यत्व नुतनीकरण करण्यात येते.
मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतणीकरणाकरीता संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतणीकरण व लाभ वाटप ऑनलाईन सादर केल्यानंतर मंडळाद्वारे प्राप्त निकषानुसार कागदपत्राची तपासणी करुन अर्ज निकाली काढण्यात येतात. कार्यालयामार्फत प्रत्येक अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा स्थितीबाबत लघु संदेशा (SMS) द्वारे बांधकाम कामगारांनी पुरविलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतो. कार्यालयामार्फत अर्ज मंजुर झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यावर कामगारांनी नोंदणी, नुतणीकरणाची पावती ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची सुविधा स्वतः कामगाराच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. अर्ज ना मंजुर झाल्यास किंवा अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास कार्यालयामार्फत दिलेल्या त्रुटीची पूर्तता करुन अर्ज परत ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करणे आवश्यक आहे.
मंडळाकडून मंजूर झालेल्या अर्जावर मंडळ मुख्यालयाकडून बांधकाम कामगार यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट DBT in money द्वारे कामगारांच्या बँक खात्यावर जमा होतात. बांधकाम कामगारांचे प्राप्त होणारे नोंदणी, नुतणीकरण व विविध लाभ बाबत अर्ज हे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे प्राथम्यक्रमानुसार (First Come First Serve)निकाली काढण्याची प्रकिया नियमित सुरू असते.
वस्तुरुपात वितरीत करण्यात येणारे साहाय्य (DBT in Kind) बाबत जीवित सक्रीय बांधकाम कामगार यांना स्वतः आयोजित कॅम्प मध्ये उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा. बांधकाम कामगारांनी मंडळामार्फत वाटप सुरु असलेल्या गृहउपयोगी संच तसेच इतर लाभासंबधीच्या कामकाजाकरीता कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतणीकरण करुन घ्यावे. याबाबबीत आपली फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुध्द नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी.