व्हॉईस ऑफ मीडियाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते; सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी दोन अनुभवी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. 'पुण्यनगरी'चे उपसंपादक वैभवराजे मोहिते आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार हे दोघेही संयुक्तपणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन सध्या पंढरपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या महत्त्वाच्या निवडीची घोषणा केली. संघटनेच्या नव्या कार्यरचनेनुसार बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात संघटनेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच मावळते जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचे लक्ष लागले होते. पंढरपूर येथील राज्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही उत्सुकता संपुष्टात आली आणि सर्वानुमते वैभवराजे मोहिते आणि सिद्धेश्वर पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले.

संघटनेत उत्साहाचे वातावरण

वैभवराजे मोहिते हे 'पुण्यनगरी'चे उपसंपादक असून, सिद्धेश्वर पवार हे देखील एक वरिष्ठ पत्रकार आहेत. या दोन अनुभवी नेत्यांच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची धुरा आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या सदस्यांमध्ये आणि पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि संघटनेचे काम अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.