केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा जनता दरबार! समस्यांचा केला "ऑन द स्पॉट" निपटारा... एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याचा "ऑन द स्पॉट" निपटारा केला... कार्यालयातून परत जाताना समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते..

   केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यात असले की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा राबता असतो. जिल्हाभरातून कार्यकर्ते त्यांच्याकडे समस्या घेऊन जातात, त्या समस्या ना.जाधव यांच्याकडून सोडवल्या जातात. १५ वर्षे सातत्याने आमदार आणि त्यानंतर सलग चौथ्यांदा खासदार झालेले ना.जाधव नेहमीच लोकांच्या गर्दीत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिल्याने त्यांच्याकडील कामाचा व्याप आता वाढला आहे. 
   आरोग्य मंत्रालयासह आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार ते सांभाळत आहेत. जगभरात भारतीय उपचार पद्धतींचा जीवनपद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आयुष मंत्रालय प्रभावीपणे करत आहे. याच महिन्यात २१ जूनला होणारा जागतिक योग दिन ना.प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे, त्याची देखील तयारी आयुष मंत्रालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
   या सगळ्या धावपळीत ना.जाधव जिल्ह्यात असले की कार्यकर्त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतात. काल १ जूनला सकाळपासून दुपारपर्यंत ना.जाधव मेकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बसून होते. जिल्हाभरातून कार्यकर्ते नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येत होते, ना.जाधव यांना समस्या सांगितल्यानंतर ना.जाधव यांच्याकडून संबंधित यंत्रणेला लगेच फोन केला जात होता, व समस्यांचा निपटारा होत होता. त्यामुळे समस्या घेऊन येणाऱ्यांच्या समस्या सुटल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते..