गाजीपूर अपघातग्रस्तांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून रुग्णालयात भेट; उपचारांची घेतली माहिती, नातेवाईकांना दिलासा....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रविवारी (दि. 20) अचानक रुग्णालयाला भेट देत अपघातग्रस्तांची प्रकृती जाणून घेतली. तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधांची माहिती घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

मोताळा तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी जात असताना 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर नंदगज येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून तब्बल 38 प्रवासी जखमी झाले होते. जखमींवर गाजीपूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काहींना सुट्टी देण्यात आली, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींमध्ये श्रीमती निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची केंद्रीय मंत्री जाधव यांनी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. उपचाराबाबत समाधान व्यक्त करतानाच त्यांनी डॉक्टरांकडून उपचार पद्धतीची सविस्तर माहिती घेतली. याशिवाय वार्ड क्रमांक 2 मधील इतर रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.
दरम्यान, रोहिणखेड येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थानी जाऊन जाधव यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच जखमी भानुदास हुंबड व नलिनी हुंबड यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.या भेटीदरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव पृथ्वीराज गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख रामदास चौथनकर, गणेशसिंग राजपूत, निलेश राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.