बुलढाण्याच्या शेतकऱ्यांसाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधवांची धाव; वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत दुष्काळसदृश यादीत जिल्ह्याच्या समावेशासाठी ठाम मागणी! फडणवीसांची सकारात्मकता...

ADVT 👆🏻
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम झाला आहे. पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार, २ सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रतापराव जाधव यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी मांडणे, ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांनुसार तातडीने फेरआढावा घ्यावा, १८ जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्याचा समावेश करावा, खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेदरम्यान सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता प्रतापराव जाधव यांच्या या पाठपुराव्यानंतर शासन बुलढाणा जिल्ह्याच्या मागणीबाबत काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.