केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले! मुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी; बुलढाणेकरांचा उर अभिमानाने भरून येईल...
Mar 11, 2026, 13:43 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्य जननी राजमाता जिजाबाई यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा राजा हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पवित्र व ऐतिहासिक भूमीत उभारण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊंचे नाव देणे उचित ठरेल, असे मत प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या नावाने हे आरोग्य मंदिर उभे राहिल्यास तो केवळ बुलढाणा जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनभावनेचा आदर करून या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे.