पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या 'विठ्ठलदर्शन एक्सप्रेस'ला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून हिरवी झेंडी…!
Jul 3, 2025, 18:40 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या 'विठ्ठलदर्शन एक्सप्रेस'ला खामगाव रेल्वे स्थानकावरून आज (३ जुलै) सकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'विठ्ठल-विठ्ठल' च्या जयघोषात भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील हजारो विठ्ठलभक्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत. या भक्तांच्या सुखसोयीसाठी खामगाव रेल्वे स्थानकातून 'विठ्ठलदर्शन एक्सप्रेस' गाडी दरवर्षी केंद्र सरकारच्या सहकार्याने सोडण्यात येते. यावर्षीची पहिली फेरी आज रवाना झाली.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्टेशनवर उपस्थित राहून भक्तांचे स्वागत केले. शिवसेनेच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. गाडीला हिरवी झेंडी दाखवून पंढरपूरच्या दिशेने निघणाऱ्या भक्तांच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, राजेश मिरगे, तालुकाप्रमुख राजू बघे, रामा थारकर, रामदास चौथनकर, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, संतोष लिप्ते, चेतन घिवे तसेच महिला आघाडीच्या जयश्री देशमुख, मयुरी शेजोळे, शीतल भोळे, योगिता राजपूत यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी, वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठल भक्तांचा हा श्रद्धेचा प्रवास सुरक्षित, सुसज्ज आणि भाविकांनी भरलेला व्हावा, हीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.