केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी भरवली जिल्हा आरोग्य यंत्रणेची शाळा! आरोग्य सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दिल्या सूचना; कामचुकार अधिकाऱ्यांना झापले!
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणाले, "आयएएस" झाले म्हणून आम्हाला कायं येडं समजता काय?
Updated: Jul 4, 2025, 18:39 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज, ४ जुलैला जिल्हा आरोग्य यंत्रणेची चांगलीच शाळा भरवली. तब्बल साडेचार ते पाच तास जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ना.जाधव यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेचा काटेकोर आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेत असलेल्या त्रुटी शोधून त्यावर मार्ग काढण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिले. याच बैठकीत कामचुकार अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावत झाप झाप झापले.. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी प्रामाणिकपणे काम करा, जनतेची सेवा करा.. कामात कसूर करणाऱ्यांना तुम्हीही सोडू नका, आणि तुम्हीही कामचुकारपणा करू नका.. नाहीतर तुमचीही गय करणार नाही असा कडक इशाराच ना.जाधव जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांना देऊन टाकला. डॉ. किरण पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात. आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी, आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ , उपसचिव विशाल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ना .जाधव यांनी आरोग्य यंत्रणातील रिक्त जागांचा आढावा घेतला. रिक्त जागा त्वरित भराव्यात, काही जागा मुलाखती पद्धतीने पंधरा दिवसांच्या आत भरा असे निर्देश ना.जाधव यांनी दिले. आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असेही ना जाधव यांनी सांगितले. क्षय मुक्त भारत बनवण्यासाठी जनजागरणासाठी स्वयंसेवी संस्था ,संघटना, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून घ्या असेही निर्देश ना.जाधव यांनी दिले. आयुष्मान भारत कार्डाची संख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तालुका स्तरावर शिबिरे घेण्याच्या सूचनाही ना .जाधव यांनी दिल्या. उपचार पद्धतीमध्ये येणाऱ्या खर्चासंदर्भातील बोर्ड प्रत्येक रुग्णालयात लावण्यात यावा असेही निर्देश ना.जाधव यांनी दिले. जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जन औषधी केंद्र सुरू करावे. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात असे स्पष्ट निर्देश ना. जाधव यांनी दिले. यापुढे आरोग्य यंत्रणे संदर्भात नागरिकांच्या तक्रारी आल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना जबाबदार धरण्यात येईल असेही ना.जाधव यांनी सुनावले...
साडेचार तास चालली बैठक...
दुपारी १ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालली. बैठकीत ना.जाधव यांनी बारीक-सारीक मुद्द्यांचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आलेल्या तक्रारींचाही ना. जाधव यांनी बैठकीतच निपटारा केला.. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही ज्या विचारत धारेवर धरले...
आम्हाला काय येड समजता काय?
दरम्यान बैठक आटोपल्यावर शेवटी जिल्ह्यातील अन्य विषयांवरूनही ना.जाधव यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ना.जाधव यांनी काही मुद्द्यांवर झापले..तुम्ही आयएएस झाले म्हणून आम्हाला काय येड समजता काय? असा सवाल गुलाबराव खरात यांना केला..त्यावेळी खरात यांचा चेहरा चांगलाच उतरल्याचे दिसले..