दहा वर्षीय गिर्यारोहक साखळीच्या सिद्धी सोनवणेचा केंद्रीय व राज्य मंत्र्यांकडून गौरव! एव्हरेस्ट बेस कॅम्पसह अनेक शिखरे सर करून भगवा व तिरंगा फडकविणाऱ्या सिद्धीच्या धाडसाचे कौतुक..

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवघ्या दहा वर्षांच्या वयात माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प, कळसुबाई शिखर, कोकणकडा, शितकडा आणि केदारकंठा यांसारखी आव्हानात्मक ठिकाणे सर करून तेथे राष्ट्रध्वज आणि भगवा ध्वज फडकविणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धी विठ्ठल सोनवणे हिचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक या छोट्याशा गावातील सिद्धी सोनवणे हिने अल्पवयातच जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या बळावर गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केले. त्यानंतर केदारकंठा, कोकणकडा, शितकडा यांसारखी दुर्गम ठिकाणे पार करत नुकतेच माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून तिने नवा विक्रम प्रस्थापित केला.

प्रत्येक शिखरावर पोहोचल्यानंतर सिद्धीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आणि भारतीय तिरंगा फडकवत राष्ट्रगीताच्या माध्यमातून देशाला मानवंदना दिली. तिच्या या पराक्रमामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

मेहकर पंचायत समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि राज्याचे गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सिद्धीचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धीने उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली असता दोन्ही मंत्र्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक करत तिला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली.

सिद्धीने आपल्या आतापर्यंतच्या गिर्यारोहण प्रवासाची माहिती उपस्थितांना दिली. तिच्या प्रेरणादायी मनोगताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विशेष म्हणजे, गिर्यारोहणाबरोबरच सिद्धीने आतापर्यंत दोन राज्यस्तरीय स्पर्धांसह तब्बल २५ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे.

सिद्धीच्या या उल्लेखनीय प्रवासात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत तिला वेळोवेळी मदतीचा हात देण्यात आला आहे. सिद्धीचे धाडस, देशभक्ती आणि जिद्द ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.