दुर्दैवी! कडबा कुट्टी मशीनचे पाते तुटले; मजुराचा जागीच मृत्यु! मासरूळ येथील राजू अपार यांच्या मृत्यूने गावावर शोककळा...
May 6, 2025, 09:38 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – मासरूळ गावातील मजूर राजू शंकर अपार (वय ४०) यांचा कडबा कुट्टी मशीनचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ मे रोजी घडली. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या जालना जिल्ह्यातील अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथील शेतात हे भयावह चित्र पाहायला मिळाले.
राजू अपार हे सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कडबा कुट्टी मशीनवर काम करत होते. काम सुरू असतानाच मशीनचे पाते अचानक तुटले आणि थेट त्यांच्या अंगावर आदळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मदतीसाठी हलवण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मजुरी करून आपला संसार चालवणाऱ्या अपार कुटुंबावर हे मोठे संकट कोसळले आहे. राजू अपार यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.