दुर्दैवी! झाडाची फांदी अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): झाडाची फांदी तोडत असताना फांदी अंगावर पडल्याने त्या खाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी वरदडी येथे उघडकीस आली. नामदेव गुलाबराव आटोळे (वय ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक शेतकरी नामदेव आटोळे यांनी बटईने केलेल्या शेतात आंब्याचे झाड होते. शेतीची मशागत करताना त्या झाडाच्या फांद्या ट्रॅक्टरला अडसर ठरत होत्या. त्यामुळे शेतकरी नामदेव आटोळे हे दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी फांद्या तोडण्यास गेले.
फांदी अर्धवट तोडून खाली उतरून फांदी ओढून मोडण्याचा प्रयत्न करीत असताना फांदी त्यांच्या अंगावर पडली. त्या फांदीखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतमालक 
विनोद काकडे शेतात फेरफटका मारत असताना आंब्याची फांदी अर्धवट तोडलेली दिसल्याने ते आंब्याखाली गेले असता त्यांना नामदेव आटोळे यांचा मृत्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
ठाणेदार विनोद नरवाडे, पोहेकाँ रमेश गोरे, सलिम परसुवाले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मुलगा आकाश आटोळे यांच्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार रमेश गोरे, सलिम परसुवाले करीत आहेत. मयत नामदेव आटोळे यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.