अशुद्ध पाणीच ठरले गोमाल मध्ये जुलाबाचे कारण! पण "त्या" तिघांचा मृत्यू कशाने झाला हे सांगता येणार नाही! कारण...नातेवाईकांनी शवविच्छेदनास दिला होता नकार ...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आदिवासी भागातील गोमाल या गावात सतरा वर्षीय तरुणीचा उपचारासाठी झोळी करून घेऊन जात असल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. याच झोळीत तिचा मृतदेह देखील गावाकडे परत आणावा लागला होता.रस्ता नसल्याने आरोग्य सुविधा पोहोचल्या नाहीत. एकूण तीन जण येथे दगावले मात्र त्यांचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने मृत्यचे नेमकं कारण समोर आलेलं नाही. दुसरीकडे १०६ जणांना जुलाब झाल्याचे आणि त्याचे मुख्य कारण हे अशुद्ध पाणीच असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने केले आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल येथे उपकेंद्र, भिंगारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ९ सप्टेंबर रोजी आ. संजय कुटे यांचे सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गिते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, तसेच जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी मौजे गोमाळ येथे भेट देऊन सद्यस्थितीची माहिती घेतली होती.
मौजे गोमाल येथे दिनांक ७ सप्टेंबर, रोजीपासून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, हगवन अशी लक्षणे असलेले १०६ रुग्ण आढळले असून त्यामध्ये २६ रुग्णांना जुलाबचा सौम्य त्रास असल्याचे दिसून आले. गावातील काही नागरिकांनी अशुध्द पाणी पिल्यामूळे सदर जुलाबाचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मौजे गोमाल मध्ये विविक्षीत कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व इतर आरोग्य कर्मचारी २४ तास उपस्थित असुन गावामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहे. या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून दैनंदिन क्लोरीनेशन करण्यात येत आहे. गावामध्ये घरोघरी मेडीक्लोर वाटप करण्यात आले असून नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून पिण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात आली असून भरती करण्यात आलेल्या रुग्णांना उपचार पश्चात प्रकृती ठिक असल्यामूळे सुटी देण्यात आली आहे.
 गोमाल येथे ३ रुग्णांचा मृत्यु झाला असून नातेवाईकांनी मृत्यु झालेल्या रुग्णांचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यास नकार दिल्यामूळे मृत्युचे कारण निश्चितपणे सांगता येणार नाही.
 सदर आजार हा कॉलरा, पटकी नसून नागरिकांनी भयभित होऊ नये. जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व निर्जंतुकिकरण करुन पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरावर तथा तालुका स्तरावर साथरोग प्रतिबंधात्मक, जलशुध्दीकरण, मान्सूनपुर्व तयारी बाबत सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय यांना याबाबतच्या करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लेखी स्वरुपात देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा यांनी आहे.