‘उलटा चोर कोतवाल को डांटे’; अवैध धंद्यांविरोधातील प्रस्तावित आंदोलनावर हर्षवर्धन सपकाळांची टीका

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांमधील ही स्पर्धा केवळ जनतेच्या मनोरंजनासाठी सुरू असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना लगावला.

“स्पर्धा करायचीच असेल तर विकासकामांची करा, कामांमधील पारदर्शकतेची करा आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची करा,” असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या अवैध धंद्यांविरोधातील आंदोलनावर भाष्य करताना सपकाळ यांनी आंदोलनकर्त्यांवरही निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सट्टा, वरली-मटका, वाळूची अवैध तस्करी, गांजा आणि गुटखा विक्री यांसारख्या अवैध व्यवसायांमध्ये जे स्वतः लिप्त असल्याचा आरोप केला जातो, तेच उपोषणाला बसत असल्याचे पाहून ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ ही म्हण आठवते.

दरम्यान, या आंदोलनाचे पुढे काय झाले आणि त्यामध्ये नेमकी काय ‘मांडवली’ झाली, याची माहिती नसल्याचे सांगत सपकाळ यांनी हे संपूर्ण प्रकरण केवळ मनोरंजनाचा भाग असल्याचा टोला लगावला.