भाेसा येथील दाेन ग्रामस्थांचे शाेले स्टाईल आंदाेलन, चक्क जिल्हा परिषद इमारतीच्या टाॅवरवरच चढले; सरपंचांना पदमुक्त करण्याच्या मागणी; सरपंच चित्रलेखा चव्हाण यांच्यावर केले गंभीर आराेप....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सरपंचांवर गंभीर आराेप करून त्यांना तातडीने पदमुक्त करण्याच्या मागणीसाठी भाेसा येथील दाेन ग्रामस्थ ३० सप्टेंबर राेजी चक्क जिल्हा परिषद कार्यालयातील टाॅवरवर चढले. या ग्रामस्थांच्या शाेले स्टाईल आंदाेलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलन सुरूच ठेवण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. संजय आश्रुजी करवते व सचिन रमेश जाधव (रा. भोसा, ता. मेहकर, जि. बुलढाणा) अशी आंदाेलन करणाऱ्यांची नावे आहेत. या ग्रामस्थांकडे पेट्रोलने भरलेली बाॅटलही असल्याने खळबळ उडाली आहे. 
या ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले हाेते. तसेच या निवेदनात कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबर राेजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. तसेच निवेदनात म्हटले हाेते की, भाेसा येथील सरपंच चित्रलेखा चव्हाण यांनी आपल्या पतीच्या नावाने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून घराचा विस्तार केला आहे. त्यामुळे गावातील रस्ता बंद झाला असून, सामान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच, ग्रामपंचायतीतील विकास निधी ३६ लाख रुपये खात्यात पडून असूनही कोणतेही काम झालेले नाही. ग्रामसभा न घेणे, मोबाईल टॉवर व ट्रान्सफॉर्मर संदर्भात खोटे ठराव घेणे, कचरा संकलनासाठी घेतलेली घंटागाडी खासगी वापरासाठी ठेवणे, जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटीमध्ये अनियमितता, तसेच सभा मंडपाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सरपंच चव्हाण यांचा मनमानी कारभार, भ्रष्ट्राचार आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय यामुळे भोसा गावातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे.
या सर्व प्रकरणाची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सरपंचांना पदमुक्त करण्याची मागणी निवेदनात केली हाेती. तसेच ३० सप्टेंबर राेजी कुठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिला हाेता. अखेर ३० सप्टेंबर राेजी हे ग्रामस्थ चक्क जिल्हा परिषद कार्यालयातील एका इमारतीवरील टाॅवरवर चढले आहेत. या आंदाेलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गुलाबराव खरात हे घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी आंदाेलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले.घटनास्थळावर पाेलिसांनाही पाचारण करण्यात आले आहे.