दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार,दोन गंभीर; एकलारा-वरवट बकाल मार्गावरील घटना; अंत्यसंस्कारातून परतणाऱ्यावर काळाचा घाला..!
Aug 29, 2025, 10:51 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.ही घटना एकलारा-वरवट बकाल मार्गावर २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळोदी (ता. शेगाव) येथील गणेश हरिदास ढोले (३२) हे नातेवाईक महिलेसह टूनकी येथील अंत्यसंस्कार कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने वरवट बकालकडून अजय लहासे (२५, रा. बावनबीर) हे आणखी दोन साथीदारांसह दुचाकीवरून येत होते.
एकलारा-वरवट मार्गावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत गणेश ढोले व अजय लहासे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, वरवट बकाल येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. वृत्त लिहीपर्यंत या अपघाताची नोंद तामगाव पोलिस ठाण्यात झाली नव्हती. अपघातस्थळी काही काळ वाहतूकही खोळंबली होती.