दोन महिने उलटले... १७ वर्षीय मुलगी अद्याप बेपत्ता! अखेर आई-वडिलांनी उचलले 'हे' टोकाचे पाऊल; बोराखेडी पोलिसांवर गंभीर आरोप
तालखेड येथील रहिवासी सुनील महादेव सपकाळ आणि सौ. ताई सुनील सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांची १७ वर्षीय मुलगी निकिता ही मोताळा येथील महाविद्यालयात इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असून, २१ एप्रिल २०२६ रोजी दीपक जमडाडे याने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर २२ एप्रिल २०२६ रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल रोजी पुन्हा पोलिस ठाण्यात पाठपुरावा करण्यात आला. तसेच ५ मे २०२६ रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातही निवेदन देण्यात आले. मात्र, दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही मुलीचा शोध लागलेला नाही आणि आरोपीविरुद्ध अद्याप गुन्हाही दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप सपकाळ दाम्पत्याने केला आहे.
निवेदनात संबंधित तपास अधिकाऱ्यावर आरोपीला पाठीशी घालण्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठाणेदार व तपास अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई करण्यात यावी, मुलीचा तातडीने शोध घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागण्यांसाठी सपकाळ दाम्पत्य २२ जूनपासून उपोषणाला बसले असून, त्यांच्या आंदोलनाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.