जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळले; झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्रांतर्गत चालठाणा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६२३ मध्ये दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. दोन्ही बिबट्यांचा आपसातील भीषण झुंजीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चालठाणा नियतक्षेत्रातील वनरक्षक आर. के. राऊत हे वनमजुरांसह नेहमीप्रमाणे जंगलात गस्तीवर होते. यावेळी कक्ष क्रमांक ६२३ मध्ये दोन बिबटे मृतावस्थेत पडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने दखल घेत घटनास्थळी पंचनामा केला. तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमांन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला.

शवविच्छेदनात झुंजीचा प्राथमिक निष्कर्ष

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बुलढाणा, पशुधन विकास अधिकारी जळगाव जामोद आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी दोन्ही बिबट्यांमध्ये झालेल्या तीव्र झुंजीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.

नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले

बिबट हा वन्यप्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असल्याने या प्रकरणात विशेष खबरदारी घेण्यात आली. पुढील तपासाच्या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने आवश्यक नमुने संकलित करून ते अमरावती येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर निर्धारित प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) दोन्ही बिबट्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, बुलढाण्याचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक विजू कटके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे करीत आहेत.

वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

या मोहिमेत वनपाल बडगुजर, वनरक्षक राऊत, कडवकर, हागोणे, अब्दुल सादिक यांच्यासह इतर वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर किंवा परिसरात पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. जंगलालगतच्या शेतात जाताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तातडीने वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.