'त्या' वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना सरसावली..! वृद्धाच्या खांद्यावरील उतरवला 'जू'! वर्गणीतून दिली बैलजोडी : कार्यकर्त्यांनी वाजतगाजत नेऊन बैलांना जुंपले औताला

 :वृद्ध दाम्पत्याचा तुपकरांशी फोन वरून संवाद.. डोळे पाणावले..!

 
 बुलढाणा/लातूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी औत ओढतोय आणि पत्नी कोळपणी करतेय... हा बळीराजाच्या दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा व्हिडीओ महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील केंद्र आणि राज्य सरकारच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. राज्यकर्त्यांनी मदत देऊ, अशा नुसत्याच वल्गना केल्या. प्रत्यक्षात मदतीचा हात पुढे आला नाही. मात्र, खऱ्या दातृत्वाची भावना काय असते, कृतिशील मदत कशी करावे लागते हे फक्त शेतकरीपुत्रांची संघटना असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दाखवून दिले आहे. लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांची वर्गणी जमवून बैलजोडी देऊन 'त्या' वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावरील 'जू' उतरविले. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत बैलजोडी शेतात नेऊन शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्या हाती कासरे दिले.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी असलेले अंबादास गोविंद पवार (वय ७५) यांच्याकडे २ एकर ९ गुंठे शेती आहे. बैलजोडी नसतानाही स्वत:च औताला जुंपून पवार दाम्पत्य शेती कसतात. अंबादास पवार हे स्वत:च्या खांद्यावर जू घेऊन औत ओढत असून, पत्नी पिकांची कोळपणी करते, या विदारक वास्तवाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. कृषी व सहकारमंत्र्यांसह अनेकांनी मदतीची घोषणा केली. मात्र मदतीऐवजी ती केवळ घोषणाच राहिली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्याची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला. चार दिवसांअगोदरच तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अंबादास पवार यांच्यापर्यंत बैलजोडी पोहोचविण्याकरिता वर्गणी जमा करण्यास सांगितले. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि १ लाख रुपये गोळा झाले. या रकमेची तरणीबांड बैलजोडी आणून शेतकऱ्याकडे सुपूर्द केली.
विशेष म्हणजे प्रत्यक्ष शेतापर्यंत ही बैलजोडी वाजतगाजत नेण्यात आली. तेथे कार्यकर्त्यांनीच बैलांना औताला जुंपून दिले.
तुम्ही मह्या नवऱ्याच्या खांद्यावरील जू काढलो.. मला लय आनंद झाला.. कातडी निघालेले बुजतील आता असं वाटालंय..!-मुक्ताबाई पवार
लातूर
'क्रांतिकारी'च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली. 'मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल. पण ते तुम्ही उतरविले. तुमचे उपकार आहेत. तुमचा मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले.' या शब्दांत रविकांत तुपकर यांचे आभार मानले.
रविकांत तुपकर यांचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभर नेटवर्क आहे. शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहणारे, अडीअडचणी सोडविणारे, शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरात हक्काचे पैसे मिळविण्यासाठी तुपकर अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्शातूनच एका शेतकऱ्याला संसार सावरला आहे.
प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांचा पुढाकार..
रविकांत तुपकर यांचे आदेश धडकताच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, राजेंद्र मोरे, अरुण कुळकर्णी, गौतम कांबळे, प्रज्योत हुडे, शिवकुमार रामशेटे, शंकर इंगळे, श्रीराम चलवाड, व्यंकट यादव, यशोदीप पाटील, लक्ष्मण चव्हाण, महेश जगताप, वैभव गायकवाड, प्रसाद जगताप यांनी पुढाकार घेत लाखाची वर्गणी उभी केली. आणि वाजत गाजत बैलजोडी बांधावर पोहचवून 'त्या 'शेतकऱ्याला आधार दिला.
... हे तर आमचे कर्तव्यच- रविकांत तुपकर
राज्यातील कोण्याही शेतकऱ्यास अडचण असेल तर संघटना धावून जाईल. सरकारने घोषणा केल्या. मात्र ते मदत करू शकले नाही. अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीची घोषणा केली आहे. शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत. तुम्ही धन्यवाद मानू नका. आमचे कर्तव्य आहे. कुठलीही अडचण आल्यास संपर्क करा. तुम्ही एकटे नाहीत. मी कायम तुमच्या पाठीशी आहे, असे अभिवचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणाऱ्या पवार दाम्पत्याला दिले.