तुपकरांचा एल्गार महामोर्चा अन् रोहित पवारांचा ट्रॅक्टर मोर्चा एकाच दिवशी! एल्गार महामोर्चाची घोषणा आधीच झालेली असताना ट्रॅक्टर मोर्चासाठी ४ डिसेंबरचीच तारीख अन् बुलढाणा जिल्हाच का निवडला?

 पवारांच्या घोषणेने राजकीय चर्चेला तोंड; शेतकऱ्यांच्या मागण्या सारख्या , सरकारही एकच, मग एकाच दिवशी वेगवेगळी आंदोलन कशासाठी? रोहित पवारांकडून सामंजस्याच्या भूमिकेची अपेक्षा; शेतकरी हितासाठी संघर्ष करणाऱ्या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वयाची गरज..!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर गावागावांत फिरत आहेत. १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा वीस दिवसांच्या प्रवासानंतर ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. या दिवशी बुलढाण्यात एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील विविध  संघटनांचे नेते, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते या संघर्षाला पाठिंबा देत आहेत. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांची व्यापक एकजूट उभी करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ४ डिसेंबर रोजीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून न्याय-हक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा ९ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. मात्र, तुपकरांच्या एल्गार महामोर्चाची घोषणा बऱ्याच दिवसांपूर्वी झालेली असताना रोहित पवार यांनी नेमकी ४ डिसेंबरचीच तारीख आणि त्यातही बुलढाणा जिल्हाच का निवडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले होते, त्यावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी नेतृत्व कोणाचे आहे, याचा विचार न करता तुपकर त्या संघर्षात सहभागी झाले होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुपकरांनी व्यापक आंदोलन उभे केले असताना रोहित पवार यांच्याकडूनही अशाच सामंजस्याच्या भूमिकेची अपेक्षा होती. महाराष्ट्रातील विविध संघटनांचे नेते बुलढाणा जिल्ह्यात येऊन तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना रोहित पवारही ४ डिसेंबरला बुलढाण्यात येऊन एल्गार महामोर्चात सहभागी होऊ शकले असते. त्यानंतर नागपूर अधिवेशनावर स्वतंत्र ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर होता. तसे झाले असते तर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अधिक प्रभावी संदेश राज्य सरकारला देता आला असता. रोहित पवारांसारख्या अभ्यासू आणि प्रगल्भ लोकप्रतिनिधीकडून अशा सामंजस्यपूर्ण भूमिकेची अपेक्षा करणे गैर ठरणार नाही.

हेक्टरी एक लाख रुपयांची दुष्काळी मदत, सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, नव्याने पीककर्ज, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती, भूमिहीन व शेतमजुरांना आर्थिक मदत आणि शेतीमालाला योग्य भाव या मागण्यांसाठी तुपकरांचा संघर्ष सुरू आहे. रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चातील अनेक प्रमुख मागण्याही याच स्वरूपाच्या आहेत. मागण्या समान आहेत, शेतकऱ्यांच्या व्यथा समान आहेत आणि न्याय मागायचा आहे तोही एकाच सरकारकडे! मग एकाच दिवशी, एकाच जिल्ह्यात दोन स्वतंत्र आंदोलने कशासाठी? एकीकडे बुलढाण्यात एल्गार महामोर्चा, तर दुसरीकडे शेगावातून ट्रॅक्टर मोर्चाचा प्रारंभ होणार असल्याने दोन्ही आंदोलनांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नेमके कुठे जावे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रोहित पवार यांनी मोर्चासाठी वेगळी तारीख अथवा अन्य जिल्ह्याची निवड केली असती, तर हा संभाव्य संभ्रम टाळता आला असता. शेतकऱ्यांची ताकद एकवटण्याची गरज असताना आंदोलनांच्या नियोजनामुळे तिची विभागणी होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दरम्यान, या घडामोडींना राजकीय किनारही आहे. रविकांत तुपकर यांच्या एल्गार महामोर्चाची तयारी जिल्हाभर सुरू असताना रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी शेगावचीच निवड का करण्यात आली? या आयोजनाबाबत जिल्ह्यातील स्थानिक राजकीय नेत्यांशी चर्चा झाली आहे का? तुपकरांच्या राजकीय विरोधकांची या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका राहणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. अर्थात, तुपकरांच्या वाढत्या प्रभावाची, आंदोलनाची ताकद कमी करण्याचा यामागे हेतू आहे किंवा त्यासाठी त्यांच्या राजकीय विरोधकांनी पुढाकार घेतला आहे का? अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचत आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकत आहेत. दिवसभर गावागावांत सभा, रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी संवाद आणि मिळेल त्या व्यवस्थेत मुक्काम करत त्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती सुरू केली आहे. या संपूर्ण संघर्षातून ४ डिसेंबरला शेतकऱ्यांची संघटित शक्ती बुलढाण्यात उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांनीही या संघर्षाला बळ देण्याची भूमिका घेतली असती, तर शेतकरी चळवळीच्या दृष्टीने ती सकारात्मक बाब ठरली असती. अजूनही समन्वय साधण्याची संधी आहे. कारण हा संघर्ष कोणत्या नेत्याचा मोर्चा मोठा होतो, यासाठी नसून दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेत्यांची एकजूट व्हावी, शेतकऱ्यांच्या शक्तीची विभागणी होऊ नये, हीच या निमित्ताने अपेक्षा आहे.