हिंगोलीत तुपकरांचा दणदणीत एल्गार! ‘आठवड्याभरात हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही’—तुपकरांचा इशारा;
जिल्हाधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यांना भेटले नाही,गेटवरच चिटकवले....
‘दुष्काळ फक्त शेतकऱ्यांनीच का भोगायचा?’
तुपकरांनी सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावरही सवाल उपस्थित केला. नैसर्गिक आपत्तीचा परिणाम केवळ शेतकऱ्यांनीच का भोगायचा, असा प्रश्न उपस्थित करत दुष्काळाचा परिणाम सर्वांवर झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्याऐवजी केवळ कागदावर उपाययोजना दाखवून उपयोग नाही. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करून भागणार नाही. शेतकऱ्यांच्या दुःखाचा बाजार मांडण्यापेक्षा त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, असा टोलाही त्यांनी सरकारमधील लोकप्रतिनिधींना लगावला.
हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर तुपकरांचा घणाघात; भेटण्यास दिला नकार
मोर्चादरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या कारभारावरूनही रविकांत तुपकरांनी जोरदार टीका केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि संबंधित फाईल आपण जमा केल्या आहेत, असा दावा करत तुपकरांनी गंभीर आरोप केले. हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभाराविरोधातील प्रकरणे बाहेर काढत मुंबईत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
“जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची मला इच्छा नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्याकडून आम्ही न्यायाची काय अपेक्षा करायची?” असा सवाल करत तुपकरांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला लक्ष्य केले. हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक देऊ आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा करू, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नाही; कावरखेंच्या मुलांच्या हस्ते गेटवरच चिटकवले
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या तडीपारीच्या निषेधार्थही या मोर्चात जोरदार आवाज उठवण्यात आला. कावरखे यांची तडीपारी रद्द करावी, अशी मागणी संघटनेने केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यास तुपकरांनी नकार दिला. त्याऐवजी गजानन कावरखे यांच्या लहान मुलगी सिद्धी, भक्ती आणि मुलगा रुद्र यांच्या हस्ते निवेदन थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चिटकवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई होते; मात्र अवैध धंदे, वाळू वाहतूक आणि गुंडगिरीविरोधात कारवाईचे काय, असा सवालही यावेळी करण्यात आला.
बैलगाडी हाकत तुपकरांची धडक; हजारो शेतकऱ्यांचा एल्गार
हिंगोलीतील या मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले ते रविकांत तुपकरांचे बैलगाडीवरून आगमन. शेतकऱ्यांच्या पारंपरिक जीवनाचे प्रतीक असलेल्या बैलगाडीचे सारथ्य करत तुपकर मोर्चासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. हजारो शेतकरी, कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाल्याने मोर्चाने हिंगोली शहर दणाणून सोडले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पीक कापणीचा प्रयोग; ‘कोरड्या जीआरने प्रश्न सुटणार नाही’
दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीक कापणीचा प्रयोगही करण्यात आला. शेतातील पीक कसे करपले आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान किती मोठे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात आला. पीकविमा कंपन्या आणि सरकारच्या मदतीच्या प्रक्रियेवरही तुपकरांनी सवाल उपस्थित केला.“कोरड्या दुष्काळाचा कोरडा जीआर काढून शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना भरीव आणि तातडीची मदत हवी,” अशी भूमिका तुपकरांनी मांडली.
सहा-आठ दिवसांत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत तुपकरांनी स्पष्ट वेळमर्यादा दिली. आठवड्याभराच्या आत हेक्टरी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, संपूर्ण कर्जमाफीसाठी जूनमधील अन्नत्याग आंदोलन, मुंबईतील विधानभवनासमोर सोयाबीन-कापूस उधळून आणि झाडावर चढून केलेले आंदोलन, मंत्र्यांच्या बंगल्यांचा व वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचे आंदोलन आणि कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी केलेला पाठपुरावा या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील मोर्चाकडे पाहिले जात आहे. २६ सप्टेंबरला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसाच्या तयारीत तुपकरांनी २७ जिल्ह्यांमध्ये हल्लाबोल आंदोलन उभे केले होते. त्यानंतर हिंगोलीतील या मोर्चातून आता पुढील आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
या मोर्चात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवाध्यक्ष लक्ष्मण मोरे, शेतकरी नेता गजानन आमदाबादकर, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, अशोक जयस्वाल, रमेश जाधव, भागवत ढवळे, राम महाराज, शांतिराम सावके, बालाजी मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.