तुपकर अनुपस्थित... पण लढ्याची मशाल पेटतीच!; राज्यभर कर्जमुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार! पुण्यात पार पडली क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महत्त्वाची बैठक!

महिला प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार यांची नियुक्ती! लवकरच राज्यभरात संघटनात्मक बांधणीचे अभियान..
 
पुणे (प्रतिनिधी) : एखाद्या संघटनेचा खरा कस तिच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत नव्हे, तर त्यांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्ते आणि पदाधिकारी किती सक्षमपणे संघटना पुढे नेतात, यावर ठरतो. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुण्यात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीने हेच अधोरेखित केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संस्थापक नेते रविकांत तुपकर बैठकीला उपस्थित राहू शकले नसले, तरी राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत त्यांच्या नेतृत्वातील सरसकट कर्जमुक्तीच्या लढ्याला अधिक धार देण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला.

 

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार केला असून, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो शेतकरी या संघटनेकडे आशेने पाहू लागले आहेत. रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पेरलेला संघर्षाचा विचार आता राज्यभर रुजत असून, संघटनेची वाढती ताकद त्याचेच द्योतक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. पुण्यातील कोथरूड येथील गणेश हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी आगामी काळातील संघटनात्मक विस्तार, कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा आणि विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे म्हणाले की, सरकारने अटी-शर्तींच्या जंजाळात अडकवून केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील लढा अधिक व्यापक आणि आक्रमक केला जाईल. राज्यातील शेतकरी आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे आश्वासक नजरेने पाहत असून, गरज पडल्यास राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी चैत्राली शेलार यांची नियुक्ती करण्यात आली, तर पूजा चव्हाण (हिमायतनगर, नांदेड) यांची मराठवाडा विभागीय महिला अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. याशिवाय राजेंद्र ढमाले (पुणे शहर जिल्हाध्यक्ष), ॲड. अनिल भिलारे (पुणे विधी आघाडी जिल्हाध्यक्ष), अमोल बोराडे (पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष), ज्योतिराम पावले (भूम तालुका संघटक) आणि विशाल लोमटे (सातारा शहर जिल्हाध्यक्ष) यांच्या नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी अभिनंदन केले आहे.

या बैठकीला राज्य समन्वयक सचिन पांडुळे, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, राज्य उपाध्यक्ष जयवंत दहिभाते, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब मुंढे, धाराशिव जिल्हाध्यक्ष भास्कर वारे, सांगली जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, युवा नेते श्रीराम चलवाड, मयूर गायकवाड, सुनील दाशाल, मल्हारी कांबळे, अजित गडदे, कांतीलाल शिंदे, शिवराम गायकवाड, अमोल घुमरे, दत्ता किन्हीकर, सावन गवळी, प्रज्योत हुडे, विशाल ढोबळे, बिभीषण शिंदे, प्रभाकर मजगे यांच्यासह राज्यभरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. रविकांत तुपकर यांची अनुपस्थिती ही केवळ शारीरिक होती; मात्र त्यांनी पेटविलेल्या शेतकरी संघर्षाच्या मशालीला आता राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांचे हात लाभले असून, कर्जमुक्तीचा लढा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची तयारी संघटनेने सुरू केल्याचे दिसत आहे.