रुग्णाला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास; टोपलीत बसवून रुग्ण मुलीस नेले रुग्णालयात ! वान नदीला पुर,

 मोमिनाबाद श गावाचा संपर्क तुटला; आजारी रुग्ण, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल ! 

 
  (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :: वारी हनुमान सागर धरण तुडुंब भरल्याने वान नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, नदीला पूर आला असून संग्रामपूर तालुक्यातील माेमिनाबाद रिंगणवाडी गावांचा संपर्क तुटला आहे.त्यातच एका रुग्णाला चक्क टाेपलीत बसवून पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेवून रुग्णालयात न्यावे लागले. त्यामुळे, विकासाच्या केवळ गप्पाच सुरू असून प्रत्यक्षात दुर्गम भागातील लाेकांना साेयी सुविधा नसल्याने जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 
संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाण्या-येण्यासाठी असलेल्या वान नदीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. रिंगणवाडी आणि मोमिनाबाद या दोन गावांच्यामध्ये वान नदीवर पूल तयार केलेला असून त्याची उंची मुळातच कमी आहे. त्यातच अलीकडे नदीपात्रात उभारलेल्या नवीन बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे मोमिनाबाद गावाचा वरवट बकाल या मुख्य बाजारपेठेशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
गावकऱ्यांच्या सोयीसाठी पूल उभारण्यात आला होता. बंधारा नव्हता तोवर सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. मात्र, जलसंधारणाच्या अनुषंगाने नदीवर बंधारा तयार केला. या बंधाऱ्याचे लाभही मिळत आहेत. परंतु दुसरीकडे पुलाची उंची कमी असल्याने व बंधाऱ्यातील पाणी पातळी अधिक राहत असल्याने वारंवार गावाचा संपर्क तुटतो. अशा स्थितीत गावातील आजारी रुग्णांना वरवट (बकाल) येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेत पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून पुल ओलांडावा लागतो. त्यामुळे रुग्णसेवेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
टोपलीत बसवून रुग्ण मुलीस नेले रुग्णालयात .!
पुरामुळे रुग्णांना रुग्णालयात कसे न्यावे ? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, २ सप्टेंबरला मोमिनाबाद येथील एक मुलगी आजारी असल्याने तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते. नातेवाइकांनी तातडीने निर्णय घेऊन जीव धोक्यात घातला आणि मुलीस प्लास्टिकच्या मोठ्या टोपलीत बसवून पूर ओलांडण्यात आला. रिंगणवाडीतून वरवट बकाल येथे रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.
सद्यस्थितीत वारी हनुमान धरणाच्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वाण नदीला पाणी वाहते असून गावाजवळ च्या पुलावरून पाणी वाहत आहे. पुलाची उंची कमी असल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी, आणि नागरिकांना दरवर्षी त्रास होतं आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.