लोणार बसस्थानक चौकात वाहतूक कोंडीची समस्या; नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून नियोजनाची मागणी
May 22, 2025, 13:49 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) |
शहराच्या मध्यवर्ती भागातील बसस्थानक चौकात वाहतूक कोंडीची समस्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी दुपारी या चौकात दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळसाठी वाहतुकीची गती मंदावली होती.
रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत चालल्याने शहरातील मुख्य चौकात अशा प्रकारच्या अडचणी वारंवार निर्माण होत आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांकडून वाहतूक व्यवस्थेचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष शुभम बनमेरु यांनी सांगितले की, "बसस्थानक चौकासह शहरातील प्रमुख ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जाव्यात."
वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता, शहरात वाहतूक नियंत्रणासाठी योग्य यंत्रणा कार्यरत करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.