महाराणी गुणवंताबाई व महाराणी दीपाताईंच्या स्मृती जपण्यासाठी करवंड स्मारक व्हावे! शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या जयश्री शेळके यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी गुणवंताबाई रभोसले आणि तंजावरचे छत्रपती व्यंकोजी राजे भोसले यांच्या पत्नी महाराणी दीपाताई भोसले यांचे माहेर असलेल्या करवंड गावात त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव ऐतिहासिक वारसा लाभलेले आहे.इथल्या इंगळे घराण्याचे स्वराज्याशी निष्ठेचे संबंध होते. हेच घराणे गुणवंताबाई आणि दीपाताई यांचे मूळघराणे होते. गावात पूर्वी ५२ बुरुज असले तरी आता फक्त ४ बुरुज शिल्लक आहेत. जयश्रीताई शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत, या दोन्ही ऐतिहासिक महाराणींच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. "राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कुटुंबातील या दोन कर्तृत्ववान सुनांचे योगदान विसरता कामा नये. त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारणे ही इतिहास व संस्कृती जपण्याची गरज आहे."करवंड गावाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत ही मागणी आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.