बुलढाण्यात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त; ९ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; बुलडाणा शहर पोलिसांची कारवाई !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मलकापूर रोडवरून पिवळ्या रंगाचा एक टिप्पर संशयास्पदरित्या जाताना दिसून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, एमएच २८ एबी ७३४० क्रमांकाच्या टिप्परमध्ये अंदाजे ३ ब्रास वाळू आढळून आली.
यावेळी पोलिसांनी वाहनचालक बबन तुकाराम जाधव (रा. सम्राट नगर, बुलढाणा) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र, त्याच्याकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत सुमारे ९ लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि ३० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अंमलदार गजानन जाधव पुढील तपास करीत आहेत.