सण उत्सवांसाठी आलेल्या आराेहीवर काळाची झडप; सर्पदंशाने आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील घटना..!

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : छत्रपती संभाजी नगर येथील वसतीगृहात शिक्षण घेत असलेली आठ वर्षीय मुलगी खंडाळा देवी येथे गावी आली. अठराविश्व दारिद्र असल्याने गाेठ्यात राहणाऱ्या या मुलीला २८ ऑगस्टच्या रात्री विषारी सापाने दंश केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. आराेही पडघान असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. 
मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील संतोष पडघान हे पत्नी, दोन मुली व एक मुलासह गावातीलच जानकीराम मानघाले यांच्या गोठ्यावर वास्तव्यास होते. हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांनी आठवर्षीय आरोही या मुलीस छत्रपती संभाजीनगर येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत आहे.
परंतु सणासुदीचे दिवस असल्याने आरोही घरी आली हाेती. मागील दोन-तीन दिवसांपासून ताप येत असल्याने तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते़ २८ ऑगस्टच्या रात्री बारा वाजता आरोही उठली. मला चक्कर येत असून गालावर काहीतरी चावल्याचे तिने सांगितले. वडिलांनी तिला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले. तेथून मेहकर ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोहीच्या उजव्या गालावर दोन ठिकाणी सापाने चावल्याच्या खुणा होत्या. विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.